Youtube

Youtube
Chanel

Friday, 25 February 2022

प्रकाशाचे गुणधर्म तपासणे

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
  *चला शिकूया प्रयोगातून विज्ञान* 
********* प्रयोग क्रमांक 6 *******
*दिनांक - 13 मार्च 2021*

*1) प्रयोगाचे नाव -*
   *प्रकाशाचे गुणधर्म - परिदर्शी /periscope चे तत्व अभ्यासणे* (प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते)

*2) प्रयोगाचे साहित्य -*
   परिदर्शी / periscope
 किंवा पुठ्याचे खोके, दोन आरसे, कात्री, चिकटपट्टी इत्यादी.
_(नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र व विज्ञान पेटी मध्ये सदर परिदर्शी दिलेली आहे)_

*3) विद्यार्थी कृती -*
एक पुठ्ठ्याचे खोके घ्या खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला खाचा करून त्यामध्ये खोक्याच्या बाजूला 45 अंशाचा कोण करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे दोन आरसे सोबतच्या आकृतीत दाखवल्या प्रमाणे बसवा व ते चिकटपट्टीने घट्ट चिटकून घ्या.
     वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस साधारणतः 1-1 इंचाच्या दोन खिडक्या करा आता खालच्या खिडकीतून पहा तुम्हाला काय दिसते याचे निरीक्षण करा.

*निरीक्षण -*
खालच्या खिडकीतून तुम्हाला वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील या तयार झालेल्या उपकरणास पारदर्शी / पेरिस्कोप असे म्हणतात.

*अनुमान व निष्कर्ष -*
प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करतात हे आपणास माहिती आहे. उदा. घरातील विद्युत बल्ब समोर हात धरला असता हाताच्या अडथळ्यामुळे घरातील विद्युत बल्ब मधून निघणारे प्रकाशकिरण अडवले जातात व आपल्याला दिवा / Bulb दिसत नाही. 
    सोबतच आरशाद्वारे प्रकाशाचे परावर्तन होते हे सुद्धा आपणास माहिती आहे.  उदा. आरश्यात चेहरा दिसतो.  म्हणजेच आरसा चेहर्या कडून आलेले प्रकाश किरण डोळ्याकडे परावर्तित करतो. 
      मात्र प्रकाशाचे परावर्तन किती वेळा होऊ शकते तर त्याचे उत्तर *कितीही वेळा* होऊ शकते असे असेल. 
🌾परिदर्शी मध्ये जी वस्तू आपल्याला दिसत आहे त्या वस्तू पासून येणारे प्रकाशकिरण पहिल्या आरशावर पडतात. 
🌾पहिल्या आरशा वरून परावर्तित होऊन दुसऱ्या आरशावर  पडतात. 
🌾दुसऱ्या आरशा वरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात म्हणजेच तेथे *परावर्तित प्रकाशाचे परावर्तन* होत असते. (दोन वेळा परवर्तन)
🌾  *एकंदरीत परिदर्शी /periscope मध्ये परावर्तित प्रकाशाचे परावर्तन होत असते. व या ठिकाणी आपती कोन व परावर्तीत कोन समान असतात* 

⛱️ पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यासाठी परिदर्शी चा उपयोग होतो. 

⛱️ बंकर्स मधील सैनिक म्हणजेच जमिनीखालील भागातील / खंदकातील सैनिक जमिनीवरील शत्रूंची टेहळणी करण्यासाठी परीदर्शी वापरतात.

⛱️ केशकर्तनालयात म्हणजेच कटिंगच्या दुकानात  मानेवरचे केस कारागीराने व्यवस्थित कापले आहेत किंवा नाही हे दिसण्यासाठी आपल्यामागे एक आरसा लावलेला असतो. आपल्या पुढील आरश्यात मागील आरशाची प्रतिमा दिसते व त्यामध्ये मानेवरच्या केसांची रचना दिसते. या ठिकाणी मानेपासून निघणारे प्रकाशकिरण मागील आरशावर पडतात व तेथून परावर्तित होऊन समोरील आरशावर पडतात, तेथून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणजेच येथे *परावर्तित प्रकाशाचे परावर्तन* होत असते. (डबल परावर्तन)

⛱️ आपण कोजागिरी पौर्णिमेला रात्री दुधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पाहतो . याठिकाणी सूर्यप्रकाश चंद्रावर पडतो व त्याचे परावर्तन होते हा चंद्रप्रकाश दुधावर पडून त्याचे पुन्हा परावर्तन होते हा प्रकाश डोळ्या पर्यंत पोहोचल्यामुळे दुधात चंद्र दिसतो.
(चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही.) अशाप्रकारे प्रकाश हा सूर्य-चंद्र-दूध-डोळे या दिशेने प्रवास करतो. 
*म्हणजेच येथे चंद्रावरील परावर्तीत प्रकाशाचे दुधामार्फत परत परावर्तन होत असते*

*चर्चेसाठी उदाहरणे -*
🔸Optic fiber कसे काम करते.
🔸Tiles / फरशीचा दुकानदार  फक्त एका फरशीच्या साह्याने, संपूर्ण खोलीत फारशी अंथरल्या नंतर कसे दृश दिसेल हे कसे दाखवतो.

_( Covid 19 बाबत शासन व मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे )_

⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️
*विज्ञान व तंत्रज्ञान विभाग*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025