_*महाशिवरात्री च्या परम पवित्र दिनी*_
_*शंकराच्या आरतीचा भावार्थ :*_
पुणे जिल्ह्यात जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदीरात
श्री समर्थ जेंव्हा लवथळेश्वराच्या दर्शनास आले तेंव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण रोज म्हणतो. बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरत्या गातो, तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती अधीक आर्ततेने करता येईल…!!
_*लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।*_
ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!
_*वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा॥*_
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!
_*लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।*_
अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे! (गंगा)
_*तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां॥१॥*_
तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!
_*जय देव जय देव जय श्रीशंकरा।*_
हे शंकरा तुझा जयजयकार असो!
_*आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा॥ ध्रु०॥*_
_*जय देव जय देव०*_
कापरासाख्या गोर्या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!
_*कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा।*_
हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस!
_*अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा॥*_
तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे,
तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत!
_*विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।*_
चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे!
_*ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥*_
_*जय देव जय देव०॥२॥*_
असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!
_*देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें।*_
_*त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें॥*_
देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले!
_*तें त्वां असुरपणें प्राशन केलें।*_
_*नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें॥*_
_*जय देव जय देव०॥३॥*_
ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला नीळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली!
_*व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।*_
वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या!
_*पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी॥*_
पाच मुखे असणार्या मनमोहका, मुनीजनांना आनंद देणार्या!
_*शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।*_
शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम" हा मंत्र सतत वाचेने उच्चारणार्या!
_*रघुकुलतिलक रामदासा अंतरीं॥*_
_*जय देव जय देव०॥४॥*_
आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो!
_*श्री समर्थ रामदास स्वामी…*_
🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment