जेम्स वेब टेलिस्कोप ने घेतलेला अजून एक अदभूत फोटो...
झाडाच्या खोडामधे दिसणाऱ्या वर्तुळांप्रमाणे अवकाशात जेम्स वेब ने ऑरगॅनिक डस्ट ची वर्तुळ पकडली आहेत. ज्या प्रमाणे झाडाच्या खोडामध्ये दिसणारी वर्तुळ ही झाडाचं साधारण आयुष्यमान स्पष्ट करतात. त्याच प्रमाणे अवकाशातील ही वर्तुळ दोन ताऱ्यांच्या मधे होणाऱ्या नाट्यमय शेवटाची साक्ष देतात.
पृथ्वीपासून सुमारे ५६०० प्रकाशवर्ष अंतरावर WR140 नावाची बायनरी ताऱ्यांची सिस्टीम आहे. यात दोन तारे हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटचा नाट्यमय प्रवास करत आहेत. यातला Wolf-Rayet नावाचा तारा सूर्यापेक्षा शेकडो हजारो पट मोठा आहे. तो त्याच्या मृत्यूच्या समीप आहे. ( आपण आज बघत आहोत तो ५६०० वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे आता कदाचित त्याचा सुपरनोव्हा झालेला असू शकतो.) यातला दुसरा तारा हा सूर्याच्या २० पट मोठा आहे. पण असं असलं तरी तो आपल्या भावाच्या मानाने मुंगी एवढा आहे. पण या दोन ताऱ्यांच्या एकमेकांभोवतीच्या परिवलनामुळे एका अविश्वनीय नजारा अवकाशात जेम्स वेब ने टिपला आहे.
हे तारे जेव्हा ३००० किलोमीटर प्रति सेकंद वेगाने एका विशिष्ठ वेळी एकमेकांच्या सानिध्यात येतात तेव्हा धुळीचं वादळ निर्माण करतात. या दोन्ही ताऱ्यांच्या वादळाची शक्ती जेव्हा जोडली जाते तेव्हा विश्वाच्या अनंत पोकळीत ही धूळ चारी बाजूने फेकली जाते. बाकीच्या वेळी या वादळाची शक्ती क्षीण होते. या प्रकारामुळे त्यांच्या आजू बाजूने अवकाशाच्या अनंत पोकळीत प्रवास करणाऱ्या धुळीचे पट्टे आपल्याला केंद्रित वर्तुळासारखे दिसतात. या दोन ताऱ्यांचा अश्या पद्धतीने जवळ येण्याचा काळ हा ८ वर्षाचा आहे. जेम्स वेब ने टिपलेल्या फोटोत आपण अशी २० केंद्रित वर्तुळ बघू शकतो. याचा अर्थ गेल्या १६० वर्षापासून हा सगळा खेळ सुरु आहे.
जेम्स वेब ने केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की या धुळीत कार्बन मिनरल्स विपुल प्रमाणात आहेत. पृथ्वी वर सजीव सृष्टी निर्माण होण्यात सगळ्यात मोठा वाटा याच कार्बन मिनरल्स चा राहिलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा अश्या पद्धतीचा सजीव सृष्टीचा उगम समजून घेण्याकडे आपण एक पाऊल पुढे टाकलं आहे.
No comments:
Post a Comment