Youtube

Youtube
Chanel

Thursday, 27 January 2022

बालभारती

*२७ जानेवारी १९६७ – आजच्या दिवशी ‘बालभारतीची स्थापना झाली.*

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत. निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोगकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे, या क्षमता आत्मसात कराव्या, तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तकनिर्मितीमागचा आहे. दरवर्षी सुमारे १९ कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरणबालभारती मार्फत केले जाते. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून बालभारतीची पुस्तके वापरली जातात.


पहिल्याच दिवशी शाळेत गेल्यावर झालेल्या अक्षर ओळखीपासून ते मराठी साहित्य म्हणजे काय? इथपर्यंत सगळी ओळख करून देण्याचे काम करणाऱ्या बालभारतीला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. लेखी पुस्तकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज इ-बुकपर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि आज २७ जानेवारीला आपली बालभारती पन्नाशीत प्रवेश करतेय.

बालभारती म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती पुस्तकातील छोटी छोटी वाक्य. अगदी 'छगन घर बघ’, ’कमल नमन कर’, ’राम हरण धर’ अशी वाक्य आजही आपल्याला आठवतील. त्यानंतर बालभारतीने शिकवलेल्या बडबड गीतांमुळे आजही बालभारतीशी नाते घट्ट टिकून आहे. एकदा शाळेत आलेल्या मुलाला बालभारती नवनवीन गोष्टी शिकवत असते. बडबड गीतांपासून झालेली सुरवात पुढे आपल्याला वेगवेगळे साहित्यकार, कवींशी ओळख करून देते. केवळ मराठी भाषाच नाही, तर गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांची ओळखही बालभारतीनेच आपल्याला करून दिली.
पुढे काळ बदलला तसे बालभारतीचे रूपही बदलले. लेखी साहित्याबरोबर इ- बुकची निर्मिती बालभारतीने केली. सध्या पहिली ते आठवी पर्यंतची बालभारतीची पुस्तकं इ-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. केवळ मराठी भाषेतच नाही, तर इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि सिंधी अशा आठ भाषांमध्ये बालभारती पुस्तकांची निर्मिती करते.

*बालभारतीची 'किशोर'निर्मिती*

पाठयपुस्तकांप्रमाणेच मुलांच्या लाडक्या 'किशोर' मासिकाची निर्मितीही बालभारतीकडूनच केली जाते. १९७३ मध्ये 'किशोर'चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. केवळ दरमहिन्याला नाही, तर दिवाळीत खास 'किशोर दिवाळी विशेष' अंकाची मेजवानी वाचकांना दिली जाते.

बालभारतीमध्ये ६ वर्षे मी संचालकपदी होतो. आज आपली बालभारती ५५ वर्षांची झालीये. आजही बालभारती वाचकांची तेवढीच लाडकी आहे. आता 'किशोर' हे मासिकसुध्दा डिजिटल स्वरूपात येत आहे. त्यामुळे 'किशोर'च्या वाचकांसाठी ही पर्वणीच ठरेल.
वसंत काळपांडे, माजी संचालक, बालभारती

*अनेक पाठ्येतर पुस्तकं प्रकाशित*
बालभारतीकडून पाठ्यपुस्तकाव्यतिरीक्त इंग्रजी-मराठी शब्दकोश, निवडक बालभारतीचे १४ खंड, दादासाहेब रेगे आणि राधाबाई शेवडे या आदर्श शिक्षकांची आत्मवृत्ते, कथा स्वातंत्र्याची, वंदे मातरम्, ग्रामगीता, लघुखेळ, स्वसंरक्षण अशी अनेक पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली


*बालभारतीचा इतिहास*

२७ जानेवारी १९६७ रोजी बालभारतीची स्थापना झाली. तर १९७१ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पहिली ते बारावीपर्यंत पुस्तकांची निर्मिती करणारे 'महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधक मंडळ' असे या संस्थेचे नाव आहे. पण आजही ते 'बालभारती' या नावाने ओळखले जाते.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025